Weather Forcast : राज्यात आजही गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा
27-11-2023
Weather Forcast : राज्यात आजही पावसाचा जोर कायम, गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज
Rain Update : काल 26 तारखेला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस पडला. आजही पाऊस सुरूच राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा येथे आज मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट तर जालना, हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट झाली असून थंडी वाढली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे हवामानात अचानक बदल होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच, पुढील दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.