आजची महत्त्वाची बातमी..! रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी नोंदणीला पुन्हा महिनाभराची मुदतवाढ
10-05-2024
आजची महत्त्वाची बातमी..!
रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी नोंदणीला पुन्हा महिनाभराची मुदतवाढ
राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. आणि त्यामुळे रब्बी हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
भंडारा जिल्ह्यात (Bhandara) धानाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जिल्ह्यात सुमारे दीड लाखांहून अधिक शेतकरी (farmers) धानाचं उत्पादन घेतात. अशातच रब्बी हंगामातील धानाची विक्री (Paddy), आधारभूत किंमत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नोंदणी करणे गरजेचे असतं. या ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत होती. मात्र, यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन नोंदणी (online registration) झालेली नसल्याने शासनाच्या वतीने दिलेली मुदत वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऑनलाईन नोंदणीची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांनी (Farmer) रब्बी हंगामाच्या धान विक्रीकरिता त्यांची नोंदणी नजिकच्या केंद्रावर (Registration Center) करावी, असं आवाहन जिल्हा पणन (MSAMB) अधिकारी यांनी केलं आहे.
31 मे पर्यंत मुदतवाढ करण्यात आली
आधारभूत किंमत धान खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2023-24 अंतर्गत धान अथवा भरड धान्य, मका इत्यादि करिता ऑनलाईन नोंदणीची तारीख ही 30 एप्रिल ठरवण्यात आली होती. मात्र, भंडारा जिल्ह्यामध्ये मागील हंगामाच्या तुलनेत अजुनही ऑनलाईन शेतकरी नोंदणी झालेली नसल्याने शासनाच्या पत्रानुसार धान, भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 31 मे 2024 अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम 2023-24 मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या केंद्रावर जाऊन करावी, तसेच त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जसे की, जमिनीचा ऑनलाईन सातबारा उतारा (चालू हंगामाचा पिकपेरा असलेला), नमुना 8 अ, बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे खरेदी केंद्रावर नेऊन तिथे आपली नावे नोंदवावी. जेणेकरून रब्बी पणन हंगामामध्ये धान विक्री करता येईल. शेतकरी बाधवांनी उन्हाळी धान खरेदीसाठी नजिकच्या शासकिय धान, भरडधान्य खरेदी करणाऱ्या संस्थांकडे कागदपत्र सादर करुन धान खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडुन करण्यात आले आहे.
राईस मिलर्सच्या प्रलंबित मागण्यांमुळे धानाची भरडाई रखडली
भंडारा जिल्ह्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यात देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची शेती करतात. शासनाच्या वतीने आदिवासी बहुल भागात आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांकडून धान खरेदी केला जातो. मात्र, आदिवासी महामंडळाचे गोडाऊन नसल्याने खरेदी केलेला धान ताडपत्रीचा आधार घेत मोकळ्या जागेवर ठेवण्यात येते. यावर्षी राईस मिलर्सच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने धानाची उचल न केल्याने गेल्या 4 महिन्यांपासून हा धान उघड्यावर तसाच पडून आहे. यावर्षी अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्याला झोडपून काढल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावातील खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाला अंकुर फुटल्याने केंद्र चालकांचे नुकसान झाले आहे.