आज राज्यातील बहुतांश भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट
06-09-2023
आज राज्यातील बहुतांश भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती
राज्यभरात दडी मारलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे. असे असताना आता पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात येत्या २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा फायदा होणार आहे.
पुणे घाटमाथ्यावर येत्या दोन दिवस येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे, तसेच नाशिक, सातारा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात आजपासून तर राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याशिवाय कोकण किनारपट्टीलगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे.
भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातदेखील दोन दिवस पावसाचा जोर वाढू शकतो. कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळणार आहे. असा हवामान खात्याकडून अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. एकदा पावसाच्या दमदार हजेरीने राज्यावरचे दुष्काळाचे सावट टळू शकते. आता या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
source : krishijagran