shetmal bajarbhav : आजच्या शेतमाल बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी - 5 सप्टेंबर 2023
05-09-2023
Shetmal Bajarbhav : आजच्या शेतमाल बाजारातील महत्त्वाच्या घडामोडी - 5 सप्टेंबर 2023
Market Rate : कापूस, डाळिंब, मोसंबी, आले यांना काय आहे मार्केट?
1. कापूस बाजारभाव
कापूस वायद्यांमध्ये काल चांगली वाढ झाल्यानंतर कापूस वायद्यांनी आज काहीशी माघार घेतल्याचं दिसतं. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही वायद्यांमध्ये कापूस नरमला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच टक्क्यांची नरमाई येऊन वायदे ८७.४१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे सव्वा टक्क्याने कमी होऊन ६० हजार ७८० रुपयांवर होते. कापूस वायद्यांमध्ये चढ उतार येत असले तरी कापूस भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. डाळिंब बाजारभाव
डाळिंबाला यंदाही शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळताना दिसत नाही. यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला. उत्पादन कमी आहे. मात्र गुणवत्ताही कमी झालेली दिसते. डाळिंबाला बाजारात ४ हजारांपासून ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे. गुणवत्तेच्या मालाला ७ हजार ते १० हजारांचा भाव आहे. डाळिंबाची गुणवत्ता कमी असल्याने ही भावपातळी कायम राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
3. मोसंबी बाजारभाव
बाजारात मोसंबीचे भाव दबावात आले आहेत. बाजारातील वाढती आवक आणि बदलत्या वातावरणामुळे गुणवत्तेवर झालेला परिणाम, यामुळे पाहीजे तसा उठाव नाही. यंदा ऐन काढणीच्या काळातही ऊन होते. अनेक ठिकाणी बागांना पाण्याचा मोठा ताण बसला. यामुळे मोसंबीवर परिणाम झाला. बाजारात मोसंबीला गुणवत्तेप्रमाणे २ हजार ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. मोसंबीची ही भावपातळी आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
4. आले बाजारभाव
आल्याच्या भावातील तेजी मागील काही दिवसांमध्ये थोडी कमी झालेली दिसते. बाजारात आल्याची टंचाई असल्याने दरात मोठी वाढ झाली होती. पण वाढलेल्या दरात विक्री वाढल्यामुळे दर स्थिरावलेले दिसतात. सध्या आल्याला बाजारात गुणवत्तेप्रमाणे ८ हजार ते १० हजारांचा भाव मिळत आहे. आपल्याच्या दरात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात. पण आल्याचे सध्याचे दर आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
5. तेलबिया बाजारभाव
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यानंतर देशात आयात वाढली. मागील पाच महिन्यांपासून आयातीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याचा दबाव देशातील तेलबिया बाजारावर आला आहे. सोयाबीनचे भाव ऑफ सिझनमध्येही दबावातच आहेत. शेतकऱ्यांना केवळ ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपयांचा भाव मिळत आहे. जुलै महिन्यात विक्रमी १७ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान आयात झाली होती. रशिया आणि आणि युक्रेन या देशांनी सूर्यफुल तेलाचा स्टाॅक कमी करण्यासाठी कमी भावात सूर्यफुल तेल देऊ केले होते. यामुळे सूर्यफुल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली. सोयातेल आणि पामतेलाचे भावही कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे देशात विक्रमी आयात झाली.
ऑगस्ट महिन्यातील आयात १८ लाख ५० हजार टनांची आयात झाल्याचे सांगण्यात आले. आयातीमुळे देशात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. सोयातेलाचे भाव ३५ टक्क्यांनी घटले. परिणामी सोयाबीन बाजारावरही परिणाम झाला. मागील आठ महिने सोयाबीनला सोयातेलाकडून आधार मिळाला नाही. उलट बाजारातील सोयाबीन आवक वाढत गेली तसे सोयातेल कमी होत गेले. पुढील आणखी काही दिवस सोयातेलाचे भाव स्थिर राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
रोजचे ताजे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा⤵️
आजचे ताजे बाजारभाव
source: agrowon