सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस कायम
12-04-2024
सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस कायम
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पाऊस आणि वादळामुळे पिकांचे नुकसान झाले. मंगळवार (बुधवार) सायंकाळी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. आंबा आणि लिंबाच्या बागांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले. अकोला जिल्ह्यातील 4060 हेक्टरवरील पिकांचे मंगळवारी झालेल्या अवकाळी मुळे नुकसान झाले. यात सर्वाधिक पातूर तालुक्यात २४ गावात २८६६ हेक्टरवर नुकसान झाले.
तेल्हारा तालुक्यात 250 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. कांदा, ज्वारी, भाजीपाला, आंबा, लिंबू, पपई, केळी, गहू, टरबूज-खरबूज अशा विविध पिकांचे हे नुकसान झाले आहे. त्यानंतर बुधवारी पुन्हा सायंकाळी झालेल्या पावसाने मोठी हानी केली. सर्वाधिक तडाखा पातूर तालुक्याला पुन्हा बसला. या तालुक्यात सुमारे २० ते २५ गावात नुकसान झाले आहे. यंत्रणांकडून आढावा घेणे सुरू आहे.
वादळाने बुधवारी लिंबाच्या बागांना तडाखा दिला. या तालुक्यात विवरा, बेलुरा व परिसरात असलेल्या अनेकांच्या लिंबू बागा उखडून गेल्या आहेत. सध्या लिंबू हस्त बहर सुरू होता. लिंबाला दरही चांगले होते.
या आपत्तीमुळे प्रत्येक बागधारकाचे लाखोंचे नुकसान झाले. पातूरसह तेल्हारा, अकोट तालुक्यांत वादळी पाऊस गारपिटीने, उन्हाळी ज्वारी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. विजेचे खांब, तारा तुटून पडल्या.