कीटकनाशके आलटून-पालटून का फवारावीत? जाणून घ्या सविस्तर माहिती..
05-04-2024
कीटकनाशके आलटून-पालटून का फवारावीत? जाणून घ्या सविस्तर माहिती..
* कीड व्यवस्थापन हा पीक संरक्षणनातील महत्वाचा भाग :- गेल्या 40-50 वर्षांमध्ये आपण रासायनिक कीड नियंत्रण पध्दत अंगीकृत केली. त्यामुळे कीड नियंत्रण झालेच त्या पटीमध्ये उत्पन्न सुद्धा वाढले. पण जसे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे रासायनिक नियंत्रणात सुद्धा अवाढव्य खर्च,त्यांचे अन्नात मिळणारे अंश,मानवी शरीरावर होणारे परिणाम त्यासोबत आता एक उफाळून येणारा प्रश्न म्हणजे किडीमध्ये निर्माण होणारी प्रतिरोध क्षमता.
कोणतेही पीक घेतले तर कीड निर्मूलनासाठी शेती सेवा केंद्रांच्या सल्ल्यातून कीटकनाशके फवारत असतो. एखादे कीटकनाशकाने कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने झाले तर पुन्हा-पुन्हा तेच कीटकनाशक वापरण्यावर आपला भर असतो. दुसऱ्या-तिसऱ्या वेळीसुध्दा आपल्याला कीड नियंत्रण झालेले दिसते. पण चौथ्या वेळी त्याच किटकनाशकाची फवारणी होते त्यावेळी कीड नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेले दिसत नाही.
* हे असे का होते :- कारण जेव्हा आपण एखादे किटकनाशक फवारत असतो, तेव्हा शेतामधील संपूर्ण 100% कीड कधी जात नाही. भले तुम्ही कितीही जहाल कीटकनाशके वापरा. फवारणी नंतर उरलेल्या किडीच्या विविध अवस्था जसे अंडी, अळ्या यांच्या माध्यमातून पुढे निर्माण झालेली पिढी त्या विशिष्ट कीटकनाशकाप्रति प्रतिरोध क्षमता घेऊन जन्माला येते. जसे आपण किटनाशकाचे प्रमाण वाढवत जाऊ तसे हा प्रतिरोध वाढत जातो. आणि एक वेळ अशी येते की कीड किटकनाशकास प्रतिसाद देणे बंद करते. हे जर टाळायचे असेल तर कीटकनाशके आलटून-पालटून फवारावी किंवा सुरवातीस सौम्य किटकनाशक फवारावे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व गरजेनुसार तीव्रता वाढवावी. याचा परिणाम असा की किडीमध्ये प्रतिरोध तयार होणार नाही.प्रत्येक फवारणीमध्ये कीड नियंत्रण हमखास होईल. म्हणूनच किटकनाशके आलाटून-पालटून फवारावी.