'दाना' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का..?
25-10-2024
'दाना' चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का..?
मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली असूनही पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नाही, तर अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पडणारा पाऊस आहे.
या दरम्यान आता एका नवीन चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. परंतू त्याचा कोणताही परिणाम हा महाराष्ट्रावर होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत.
आता ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे येणारे 'दाना' चक्रीवादळ आता लँडफॉलसमयी आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या काळामध्ये वाऱ्याचा वेग ताशी १०० ते १२० किमी इतका असणार आहे. त्यामुळे आता त्या भागामधील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दल 'दाना' चक्रीवादळावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
त्यामुळे आता चक्रीवादळाचा परिणाम तपासण्यासाठी तब्बल ५६ पथके तैनात करण्यात आली आहे. दिवाळी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना राज्यामध्ये पाऊस हजेरी लावत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह कोकणात देखील पाऊस हजेरी लावणार आहे.
महाराष्ट्रामध्ये वादळाची भिती नाही महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली असली तरी राज्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यामध्ये येत्या २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता सांगितली आहे. चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाने कळविले आहे.
येथे असेल ढगाळ वातावरण:
- विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- मराठवाड्यातील परभणी, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- पुणे घाटपरिसरात पाऊस पुण्यासह सातारा, सांगली येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे मान्सूननंतरही पाऊस पाठ सोडत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
कोकणातील रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे या क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
याशिवाय राज्यामधील अनेक भागांमध्ये शेतांमधील पिके सध्या कापणीसाठी आलेले आहे. पण, याच दरम्यान पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या गहू पेरणीला विलंब होत असल्याचे दिसून येत आहे.