कोणती हिवाळी पिके लावावी..?
14-10-2024
कोणती हिवाळी पिके लावावी..?
परभणी जिल्ह्यामधील शेकडो हेक्टर जमीन निम्न दुधना प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली आहे. प्रत्येक वर्षी जालना पाटबंधारे विभाग व माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० या दोन विभागांकडून रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाणी आवर्तनाचे नियोजन केले जाते.
पण, यंदा या विभागाला पाणी आवर्तनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाही. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
यंदा चांगल्या पावसामुळे निन्म दुधना प्रकल्पात मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या खरिपामधील सोयाबीन पेरणी आटोपली असून, शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करत आहेत.
तर दुसरीकडे मात्र पाणी आवर्तनाचे नियोजन करणाऱ्या विभागाची मात्र तयारी होताना दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. रब्बी हंगाम पाणी आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक होत असते.
यंदा मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी अद्यापही पाणी आवर्तनाच्या हालचाली दिसत नसल्याची स्थिती आहे. पाणी आवर्तन जाहीर झाले असते तर शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन करता आले असते. मात्र, अद्यापही याकडे लक्ष दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
हिवाळ्यातील पिके:
खरिपात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी केली जाते. सोयाबीन काढणीनंतर शेतकरी गहू, हरभरा, भुईमूग, ज्वारी आदी पिकांची पेरणी करतात. यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा, गव्हाची पेरणी होते.