निशिगंध
29-02-2024
निशिगंध(TUBEROSE )
फुलाची ओळख :
निशिगंध हे कंदवर्गीय फुलपीक गुलछडी व रजनीगंधा या नावानेही ओळखले जाते. याची फुले पांढरी शुभ्र, अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात. प्रामुख्याने याच्या फुलांचा हार, गजरे, माळा, वेण्या तयार करण्यासाठी उपयोग होतो. तसेच फुलदांड्यांचा फुलदाणी आणि पुष्पसजावटीसाठी उपयोग होतो. तसेच व्यापारी तत्त्वावर निशिगंधाच्या फुलांचा उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे निशिगंधाच्या फुलांना बाजारात वर्षभर मागणी असून बाजारभावही चांगला मिळतो. या पिकाची लागवड करणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे. याची लागवड कुंडीतही करता येते. या पिकाच्या काही जातींची पाने रंगीत असल्याने बागेमध्ये सजावटीसाठीही त्याची लागवड करतात.
जमीन :
निशिगंध पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येत असले तरी उत्तम निचऱ्याची हलकी ते मध्यम जमीन यास चांगली मानवते. चुनखडीयुक्त तसेच हरळी व लव्हाळ्यासारखी बहुवर्षीय तणे असलेली जमीन या पिकास योग्य नाही. निशिगंधासाठी निवडलेली जमीन जर हलकी असेल तर लागवडीपूर्वी जमिनीत भरपूर सेंद्रिय पदार्थ टाकावेत. कारण अतिशय हलक्या जमिनीमध्ये निशिगंधाची लागवड केल्यास वाढ व उत्पादनावर परिणाम होतो.
हवामान :
निशिगंध पिकाला उष्ण व समशितोष्ण हवामान चांगले मानवते. मात्र अति थंड, उष्ण व पावसाचे हवामान या पिकास हानिकारक ठरते. याच्या चांगल्या वाढीसाठी २०-२५० से. तापमान आवश्यक असते. तसेच वार्षिक पाऊस ५००-७०० मिलि. असलेल्या विभागात हे पीक चांगले येते.निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे कंदाची वाढ जमिनीत होते.
त्यामुळे जमिनीची मशागत चांगल्या पद्धतीने करावी लागते. लागवडीसाठी प्रथमत: जमिनीची खोल नांगरट करावी. लागवडीपूर्वी नांगरलेली जमीन किमान एक महिना उन्हात चांगली तापू द्यावी. नंतर जमीन उभी-आडवी कुळवून माती भुसभुशीत करावी. हेक्टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खत मातीत मिसळावे. निशिगंधाची लागवड पोटपाण्याची सोय असल्यास सपाट वाफ्यावर किंवा सरीवरंब्यावर आणि तुषार किंवा ठिबक सिंचन असल्यास गादी वाफ्यावर ३० x ३० सेंमी अंतरावर करावी.लागवडीसाठी निरोगी व आकाराने मोठ्या (२.५ ते ३ सेंमी. व्यासाच्या आणि साधारणत: २०-३० ग्रॅम वजनाच्या) अशा कंदाची निवड करावी. निवडलेले कंद लागवडीपूर्वी ०.३ टक्के कॅप्टॉपच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लावावेत. कंदाची लागवड जमिनीत ५.७ सेंमी. खोल करावी. लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. भरपूर व उत्तम प्रतीच्या उत्पादनासाठी एप्रिल-मे महिन्यात ही लागवड करावी.
प्रकार व जाती :
निशिगंधाची सुट्या फुलांसाठी आणि दांड्यासाठी लागवड केली जाते. फुलांच्या पाकळ्यांच्या वलयांच्या संख्येनुसार व पानांच्या रंगानुसार गुलछडीचे सिंगल, डबल, सेमी डबल व व्हेरीगेटेड असे चार प्रकार पडतात. सिंगल प्रकारच्या निशिगंधाची फुले अतिशय सुवासिक असतात. त्यांचा उपयोग सुवासिक द्रव्यांसाठी तसेच हार, माळा, गजरे तयार करण्यासाठी केला जातो. फुले रजनी, अर्का प्रज्वल, अर्का निरंतरा व स्थानिक सिंगल अशा याच्या सुधारित जाती लागवडीखाली आहेत.
डबल प्रकारात सुवासिनी, स्थानिक डबल, वैभव या जाती लागवडीखाली आहेत. हा प्रकार प्रामुख्याने फुलदांड्यासाठी वापरतात.
सिंगल अर्का वैभव ही सेमी डबल प्रकाराची सुधारित जाती असून या जातीची फुले फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी वापरतात. व्हेरीगेटेड प्रकारात निशिगंधाची पाने रंगीत असतात. पानावर पिवळ्या रंगाचा चट्टा मध्य शिरेलगत असतो. याचा उपयोग बागेमध्ये सजावटीसाठी अथवा कुंडीत लागवडीसाठी करतात. सुवर्णरेखा व रजतरेखा या व्हेरिगेटेड प्रकाराच्या जाती आहेत.
लागवड पूर्व तयारी :
ज्या ठिकाणी निशिगंधाची लागवड करावयाची आहे ती जमीन मार्च एप्रिल महिन्यात खोल नांगरावी. त्यानंतर दोन ते तीन वेळा फणणी करून धसकटे, हरळीच्या कशा वेचाव्यात व जमीन स्वच्छ व भुसभुशीत करावी. त्यानंतर हेक्टरी २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे व हेक्टरी ७५ किलो नत्र, ३०० किलो स्फुरद, व ३०० किलो पालाश लागवडीपूर्वीच जमीनीत मिसळून द्यावे. वरील सर्व सेंद्रिय व रासायनिक खते जमिनीत चांगले मिसळून घ्यावीत व नंतर जमिनीच्या प्रकारानुसार सपाट वाफे अथवा सऱ्या पाडून रान बांधणी करावी.
पाणी व खत व्यवस्थापन :
निशिगंधाला लागवडीनंतर ताबडतोब पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात पाच ते सात दिवसाच्या अंतराने, तर हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीच्या गुणधर्मानुसार कमी-अधिक दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात आवश्कतेनुसार पाणी द्यावे. निशिगंधाला फुलदांडे पडावयास सुरुवात झाल्यानंतर पाण्याचा ताण पडू देऊ नये. उत्पादन काळात पिकास पाण्याचा ताण पडल्यास त्याचा थेट विपरीत परिणाम उत्पादन व प्रतिवर होतो. पावसाळ्यात पिकामध्ये जादा साठणाऱ्या पाण्याचा ताबडतोब निचरा होईल अशी सोय करावी.निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खताला उत्तम प्रतिसाद देते. पिकांच्या चांगली वाढ व उत्पादनासाठी हे. ३० टन शेणखत अथवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करताना शेतात मिसळावे. निशिगंधासाठी २०० किग्रॅ. नत्र, १५० किग्रॅ. स्फुरद व २०० किग्रॅ. पालाश प्रति हेक्टर ही रासायनिक खतमात्रा द्यावी. लागवडीनंतर उर्वरीत नत्राची मात्रा ३०, ६० व ९० दिवसांनी तीन समान हप्त्यात विभागून द्यावी. याशिवाय लागवडीनंतर ८-१० दिवसांनी १० किग्रॅ. ॲझेटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरीयम, स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत १० किग्रॅ. आणि ट्रायकोडर्मा १० किग्रॅ. प्रत्येकी १०० किग्रॅ. ओलसर शेणखतात मिसळून द्यावे.
पीक संरक्षण :
निशिगंध हे फुलपीक किडी व रोगासाठी फार संवेदनशील नाही. तरीही अल्पप्रमाणात फुलकिडे व अळी या किडींचा तसेच फुलदांड्यांची कूज व पानांवरील ठिपक्या रोगांचा मुख्यत्वेकरून पावसाळी प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी मोनोक्रोटोफॉस, फॉस्फोमिडॉन (यापैकी एक मावा व फुलकिडे यांसाठी १० मिलि. १० लि. पाण्यातून), एन्डोसल्फाॅन (अळीसाठी २० मिलि. १० लि. पाण्यातून), डायथेन एम-४५, कार्बनडेझिम (फुलदांड्याची कूज व पानांवरील ठिपके या रोगासाठी २० ग्रॅ. १० लि. पाण्यातून) अशा कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी.
खते :
लागवडीनंतर ४५ दिवसांनी हेक्टरी ६५ किलो नत्र व ९० दिवसांनी ६० किलो नत्र द्यावे. निशिगंधास प्रति वर्षी २०० किलो नत्र, ३०० किलो स्फुरद व ३०० किलो पालाश याप्रमाणे खते आवश्यक आहेत.
फुलांची काढणी :
निशिगंधाच्या लागवडीपासून तीन ते चार महिन्याच्या कालावधीत फुले काढणीस तयार होतात. निशिगंध प्रामुख्याने सुटी फुले, फुलदांडे व सुगंधी द्रव्ये या उद्देशाने लावला जातो. सुट्या फुलांसाठी पूर्ण वाढलेल्या कळ्या अथवा उमललेल्या फुलांची काढणी करावी. दांड्यासाठी फुलदांड्यावरील तळाच्या दोन फुलांच्या जुड्यातील फुले उमलल्यानंतर काढणी करावी. असे दांडे जमिनीलगत पानांच्या वर धारदार चाकूच्या साहाय्याने कापावेत. सुगंधी द्रव्यासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करतात. निशिगंधाच्या फुलांची व दांड्याची काढणी ही सकाळी ६-८ किंवा सायंकाळी ६-७ च्या दरम्यान करावी. फार उशिरा किंवा कडक उन्हामध्ये फुलांची काढणी केल्यास त्यांच्या प्रतिवर व साठवणूकीवर विपरीत परिणाम होतो.सर्वसाधारणपणे निशिगंधाचे हेक्टरी ८-९ लाख फुलदांडे; तर ७-८ टन सुट्या फुलांचे उत्पादन मिळते. भारतीय बाजारात सुट्या फुलांना खूप मागणी असते,अशी फुले ५-७ किलो क्षमतेच्या कागदाच्या अथवा बांबूच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवावीत.तर फुलदांड्याच्या १२, २०, ५० दांड्याच्या जुड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदामध्ये गुंडाळून अथवा पुठ्ठ्याच्या खोक्यात भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवाव्यात.
हे लक्षात ठेवा:
कंदाची लागवड हलक्या जमिनीत १५ ते १७.५ से. मी. व भारी जमिनीत १० ते १२ से. मी. खोल करावी. लागवडीनंतर ४५ ते ९० दिवसांनी नत्र युक्त खते दिल्यास झाडांची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते.कंदाची उगवण सुरु असताना जास्त पाणी देणे टाळावे.