महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस…
07-05-2025

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यांसह जोरदार पाऊस…
राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याचे संकेत मिळत असून अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाला पोषक हवामान तयार झाल्यामुळे तापमानात लक्षणीय घट होत आहे.
आज, दिनांक ७ मे, महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपिटीचा धोका असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इतर भागांतही जोरदार वारे आणि पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामानातील बदलाचे कारण काय?
दक्षिण तेलंगण भागात चक्राकार वारे सक्रिय झाले असून, त्यापासून रायलसीमा, तमिळनाडू ते मनारचा आखात यामध्ये दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
तापमानात घसरण सुरू:
मध्यप्रदेशातील नरसिंहपूर येथे देशातील सर्वाधिक ४३°C तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही मालेगाव येथे ४१.८°C तापमान नोंदले गेले. अकोला, सोलापूर, परभणी येथेही तापमान ४१°C च्या पुढे गेले आहे. धुळे, जेऊर, चंद्रपूर, यवतमाळ याठिकाणीही ४०°C च्या पुढे तापमान राहिले आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे आता तापमानात कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
आज कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड – या जिल्ह्यांमध्ये आज गंभीर वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी जास्तीत जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे.
येलो अलर्ट असलेले जिल्हे कोणते?
कोकणमधील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
मध्य महाराष्ट्रातील – नंदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,
मराठवाड्यातील – धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड,
विदर्भातील – यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली
या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.