मुंबईत संततधार, पुण्यात मुसळधार; राज्यात मोसमी वारे सक्रिय, 28 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

मुंबईत संततधार, पुण्यात मुसळधार; राज्यात मोसमी वारे सक्रिय, 28 जूनपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

मुंबईत संततधार, पुण्यात मुसळधार; राज्यात मोसमी वारे सक्रिय; कोकणातील स्थिती काय?


 मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी संततधार सुरू असून पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
 मागील काही दिवसांपासून हर्णे आणि सोलापूर येथे रेंगाळलेल्या मान्सूनने सोमवारी मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत यशस्वी घोडदौड केली. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबई आणि पुणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासूनच मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध भागात हलक्या सरी ते मुसळधार पाऊस कोसळत आहे.

 

यंदा जून महिना संपत आला तरीही राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे; तसंच काही भागांत अद्यापही उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती कायम आहे. मात्र, सोमवारपासून मान्सूनने राज्यातील इतर भागांतही हळूहळू वाटचाल करण्यास सुरुवात केल्यामुळे पुढील काही दिवसांत तो पूर्णपणे सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ८ जून रोजी हर्णे आणि सोलापूर येथे दाखल झालेल्या मान्सूनने तब्बल १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुण्यासह अलिबाग गाठले आहे. दरम्यान, मंगळवारीही मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्याला वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

 

मुंबईत संततधार
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज हलक्या सरींना सुरुवात झाली असून पुण्यात मात्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, वरळी, मालाड, जोगेश्वरी आणि बोरिवलीसह संपूर्ण शहरात पावसाची संततधार सुरू आहे. पावसाची संततधार सुरू असली तरीही उकाड्यातून सुटका झाल्याने मुंबईकरांनी मोठा दिलासा मिळाला आहे.


पुण्यात मुसळधार
अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा, सुंदरगढ, गया आणि मुझफ्फरपूरपर्यंत पोहोचली असून, येत्या ४८ तासांत त्यांची पुढील वाटचाल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पुण्याच्या जुन्नर परिसरात आजसकाळ मुसळधार पाऊस सुरू आहे. माळशेज घाट ते अणे पठार परिसरात पावसाने हजेरी लावली आहे.


दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील तलावाडा शिवरात मुसळधार पाऊस झाला असून, या पावसामुळे तेथील तात्पुरता बांधलेला पूल वाहून गेला आहे.


कोकणातही दमदार आगमन
कोकणातही पावसाचं दमदार आगमन झालं असून, उन्हामुळे करपू लागलेल्या भात रोपांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून चिंतेत सापडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर आता समाधानाचे भाव दिसून येत आहेत.


कोकणातील प्रमुख ठिकाणची पाऊस नोंद (मिमी):

देवगड: १२६ मिमी
कुडाळ: १०३ मिमी
वैभववाडी: ९७ मिमी
कणकवली: ९० मिमी
सावंतवाडी: ८७ मिमी
दोडामार्ग: ८० मिमी
मालवण: ३४ मिमी
वेंगुर्ला: ३० मिमी
(जिल्ह्यात आज एकूण ८०.८७ मिमी इतक्या सरासरी पावसाची नोंद झाली आहे.)

२८ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जूनपर्यंत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.


मुंबईत किती पाणीसाठा?
? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल 
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख धरणांमधील आजची स्थिती (२३ जून २०२६ – सकाळी ६ वाजेपर्यंत):

मोडक सागर: २४ तासांत १३ मिमी पाऊस; उपयुक्त साठा २१.०६ टक्के.
तानसा: २४ तासांत ४ मिमी पाऊस; उपयुक्त साठा २.२१ टक्के.
मिडल वैतरणा: २४ तासांत ५५ मिमी पाऊस; उपयुक्त साठा १०.७८ टक्के.
भातसा: २४ तासांत १६ मिमी पाऊस; उपयुक्त साठा ७.३३ टक्के.
विहार: २४ तासांत ० मिमी पाऊस; उपयुक्त साठा ४०.७७ टक्के.
तुळशी: २४ तासांत ० मिमी पाऊस; उपयुक्त साठा २१.५० टक्के.