जनावरांची नोंदवही का ठेवावी? दूध उत्पादन, आरोग्य आणि नफा वाढवण्यासाठी महत्त्वाची माहिती

जनावरांची नोंदवही का ठेवावी? दूध उत्पादन, आरोग्य आणि नफा वाढवण्यासाठी महत्त्वाची माहिती
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

जनावरांच्या कार्यक्षमतेची नोंदवही ठेवा; दूध उत्पादन, आरोग्य आणि नफ्याचे नियोजन होईल सोपे

शेतकरी बांधवांनो, पशुपालन व्यवसायात जनावराला रोज किती दूध मिळते एवढीच माहिती पुरेशी नसते. त्या जनावराचे वर्षभरातील दूध उत्पादन, प्रजनन, आरोग्य, वजनातील वाढ, लसीकरण आणि आहार यांची नियमित नोंद ठेवली, तर कळपाचे व्यवस्थापन अधिक शास्त्रीय पद्धतीने करता येते. यासाठी ‘पशुधनाच्या कार्यक्षमतेची नोंदवही’ महत्त्वाची ठरते.

पशुधनाच्या कार्यक्षमतेची नोंदवही म्हणजे काय?

जनावरांची ओळख, दूध उत्पादन, प्रजनन, वाढ, आरोग्य, आहार आणि लसीकरण यांसारखी माहिती नियमितपणे एका ठिकाणी नोंदवून तिचे विश्लेषण करण्याची पद्धत म्हणजे पशुधनाच्या कार्यक्षमतेची नोंद प्रणाली.

या नोंदीमुळे कोणते जनावर अधिक उत्पादनक्षम आहे, कोणत्या जनावराच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि पुढील पैदाशीसाठी कोणत्या जनावराची निवड करावी, हे ठरवणे सोपे होते.

नोंदवहीमध्ये कोणती माहिती लिहावी?

१. जनावराची ओळख

प्रत्येक जनावरासाठी खालील माहिती नोंदवावी:

  • कानावरील ओळख क्रमांक
  • जात
  • जन्मतारीख
  • लिंग
  • आई-वडिलांची माहिती

२. दूध उत्पादनाची नोंद

दररोजच्या दूध उत्पादनाची नोंद ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये:

  • दररोजचे दूध उत्पादन
  • वेतापासून दूध देण्याचा कालावधी
  • एकूण दूध उत्पादन
  • दुग्ध कालावधी
  • सर्वाधिक दूध उत्पादन
  • दुधातील फॅट
  • एसएनएफ

यांचा समावेश करता येतो.

यामुळे वर्षभरात कोणती गाय किंवा म्हैस अधिक दूध देते, याची अचूक माहिती मिळते.

३. प्रजननाची माहिती

जनावरांच्या प्रजननाशी संबंधित माहितीही नियमित लिहावी. उदाहरणार्थ:

  • लैंगिक परिपक्वतेचे वय
  • पहिल्या वेताचे वय
  • दोन गर्भधारणांमधील अंतर
  • दोन वेतांमधील अंतर
  • कोरडा कालावधी
  • गर्भधारणेसाठी लागलेल्या सेवांची संख्या

या नोंदींमुळे प्रजनन व्यवस्थापन अधिक प्रभावी करता येते.

४. जनावराच्या वाढीची नोंद

जन्मावेळचे वजन आणि त्यानंतरची वजनातील वाढ नोंदवावी. महिन्यानुसार वजनात किती वाढ होत आहे, हे पाहिल्यास जनावराची वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही, हे समजते.

५. आरोग्य आणि लसीकरणाची नोंद

जनावराला कोणता आजार झाला, तो कधी झाला आणि त्यावर कोणते उपचार केले याची नोंद ठेवावी.

तसेच:

  • लसीकरणाची तारीख
  • पुढील लसीकरणाची तारीख
  • जंतनाशक औषधोपचार
  • आजाराचा इतिहास
  • केलेले उपचार

यांची माहिती नोंदवहीत ठेवणे फायदेशीर ठरते.

नोंदवही ठेवल्यामुळे काय फायदे होतात?

अधिक उत्पादनक्षम जनावरांची निवड: चांगले दूध उत्पादन आणि चांगले गुणधर्म असलेल्या जनावरांची ओळख पटते.

निवडक प्रजनन: उत्तम नर आणि मादींची निवड करून पुढील पिढीत चांगले गुणधर्म आणण्यास मदत होते.

कळप व्यवस्थापन सुधारते: कोणते जनावर फायदेशीर आहे, कोणत्या जनावराकडे विशेष लक्ष द्यायचे आहे, हे स्पष्ट होते.

आहाराचे नियोजन सोपे होते: जनावराचे उत्पादन आणि त्यानुसार आहाराची गरज यांचा योग्य मेळ घालता येतो.

आजाराचे व्यवस्थापन सोपे होते: पूर्वीचा आजार आणि उपचारांचा इतिहास उपलब्ध असल्याने पुढील उपचार आणि लसीकरणाचे नियोजन करता येते.

दूध उत्पादनातील बदल वेळीच समजतो: एखाद्या जनावराचे दूध अचानक कमी झाले तर आरोग्याशी संबंधित समस्या असण्याची शक्यता लवकर लक्षात येऊ शकते.

खर्च आणि नफा देखील मोजता येतो

नोंदवहीमध्ये जनावराच्या चारा, पशुखाद्य आणि इतर व्यवस्थापनावरील खर्चाची माहितीही लिहिता येते. त्यामुळे एखाद्या जनावरावर किती खर्च होतो आणि त्यापासून किती दूध मिळते, याची तुलना करता येते.

यातून कोणते जनावर शेतकऱ्यासाठी अधिक फायदेशीर आहे, हे ठरवणे सोपे होते.

डिजिटल नोंदवहीचाही वापर करता येतो

आजच्या काळात ही माहिती वहीमध्ये लिहिण्यासोबतच डिजिटल माध्यमातूनही जतन करता येते. मात्र नोंदी नियमित आणि अचूक असणे महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती नोंदवल्यास त्यावर आधारित निष्कर्षही चुकीचे येऊ शकतात.

शेवटी...

पशुधनाची कार्यक्षमतेची नोंदवही ही केवळ जनावरांची माहिती लिहिणारी डायरी नाही, तर दूध उत्पादन वाढवणे, प्रजनन सुधारणा, आरोग्य व्यवस्थापन आणि पशुपालनातील नफा वाढवण्यासाठी उपयुक्त साधन आहे.

म्हणून प्रत्येक पशुपालकाने आपल्या जनावरांची ओळख, दूध उत्पादन, प्रजनन, वजन, आरोग्य, लसीकरण आणि आहाराची नियमित नोंद ठेवण्याची सवय लावणे फायदेशीर ठरेल.

ही माहिती लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु अनुवंशशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय धावारे यांनी दिली आहे.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा