३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास 'पीएम किसान'चा हप्ता होणार बंद; जाणून घ्या सोपी पद्धत

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास 'पीएम किसान'चा हप्ता होणार बंद; जाणून घ्या सोपी पद्धत

३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास 'पीएम किसान'चा हप्ता होणार बंद !

 

सरकारची शेवटची मुदत : अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसीकडे दुर्लक्ष, कृषी विभागाची मोहीम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क, उदगीर: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. मुदतीत ही प्रक्रिया न केल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुढील दोन हजारांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मोबाईल ॲपद्वारे फेसऑथेंटिकेशन, आधार प्रमाणीकरण तसेच सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा करून देण्यात आली आहे.

 

२३ वा हप्ता कधी जमा होणार?...

केंद्र सरकारकडून ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात २३ वा हप्ता जमा केला जाणार आहे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.

 

ई-केवायसीची पद्धत काय?

  • बायोमेट्रिक: सीएससी सेंटर, तलाठी कार्यालय अथवा बँकेत जाऊन बोटांचे ठसे देऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करता येते.

  • फेस ऑथेंटिकेशन: स्वतःच्या मोबाईलमध्ये पीएम किसान अथवा उमंग ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकल्यानंतर ओटीपी येतो. ई-केवायसीवर क्लिक केल्यानंतर त्या ॲपला स्वतःचा चेहरा मोबाईलद्वारे दाखवून घरबसल्याही ई-केवायसी करता येते.

  •  

वृद्ध शेतकरी व दिव्यांगांसाठी घरपोच सुविधा

८० वर्षांवरील वृद्ध अथवा आजारी असलेले आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग शेतकऱ्यांसाठी सीएससी सेंटरवरील कर्मचारी घरपर्यंत जाऊन बायोमेट्रिक ई-केवायसी करणार आहेत. त्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरमध्ये अथवा तलाठ्याकडे नाव नोंदवावे लागते.

 

कृषी विभागाची मोहीम

खरीप हंगामाच्या निमित्ताने कृषी विभागाकडून गावोगावी मेळावे घेण्यात येत आहेत. त्यात जनजागृती सुरू आहे.

 

कशामुळे ई-केवायसी बंधनकारक?...

बोगस आणि अपात्र व्यक्तींचा लाभ रोखण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी सक्तीची केली आहे. आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच पैसे जमा होतात का? शेतकरी हयात आहे का? याची पडताळणी यातून होते.

 

ई-केवायसीसाठी ३० जूनची मुदत...

पीएम किसानचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ३० जूनपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत.

 

ॲग्रीस्टॅक नोंदणीही अत्यावश्यक...

ई-केवायसीबरोबर शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. भविष्यातील विविध कृषी योजना, अनुदान व डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची मानली जाते. ॲग्रीस्टॅक नोंदणी न केल्यास भविष्यात शासन योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात.