हवामान अंदाज: २५ जून ते १० जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागात दमदार पाऊस; पेरण्यांची लगबग सुरू!

हवामान अंदाज: २५ जून ते १० जुलै दरम्यान राज्याच्या विविध भागात दमदार पाऊस; जुलैच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा!
"शेतकरी बांधवांनो, राज्यात सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून २५ जूनपासून ते थेट १० जुलै २०२६ पर्यंत दररोज भाग बदलत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडणार आहे. ज्या भागात अद्याप पाऊस झाला नाही, तिथेही या आगामी १०-१२ दिवसांत चांगला पाऊस पडून सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील. त्यामुळे दुष्काळाची चिंता मनात बाळगू नका," असा अत्यंत महत्त्वाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी थेट आपल्या शेतातून दिला आहे.
ईतभर ओल असल्याशिवाय पेरणी करू नका!
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना घाईगडबडीत पेरणी न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. केवळ चार ते सहा बोटं ओल्या जमिनीवर पेरणी केल्यास पिकांचे नुकसान होऊ शकते. जेव्हा शेतात चांगली 'ईतभर' (पुरेशी) ओल खाली उतरेल, तेव्हाच पेरणीचा निर्णय घ्या. अशी ओल असल्यावर पुढे १५ दिवस पाऊस जरी नाही आला, तरी पीक जमिनीत सुरक्षित टिकून राहते.
२६ ते ३० जून दरम्यान विविध प्रादेशिक अंदाज
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा: सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्यातील कडा आणि आष्टी या पट्ट्यामध्ये २६ ते ३० जून दरम्यान दमदार पाऊस पडेल आणि पेरण्या मार्गी लागतील.
विदर्भ व उत्तर महाराष्ट्र: विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांत आजपासून पाऊस वाढेल. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस होणार आहे.
कर्नाटक, तेलंगणा सीमाभाग: कर्नाटक सीमावर्ती भाग, तेलंगणा आणि तिखोती परिसरातील शेतकऱ्यांच्या भागातही २६ जूननंतर पाऊस सुरू होईल.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक!
जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, पुणे, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे अहिल्यानगर, संगमनेर परिसरासह निळवंडे धरण आणि कोयना धरणाच्या कॅचमेंट एरियात पाण्याची मोठी आवक सुरू होईल.
यंदा जूनमध्ये पाऊस जेमतेम असला तरी जुलैमध्ये मुसळधार, ऑगस्टमध्ये सरासरी आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याने पिके खूप चांगली येतील.