हवामान अंदाज: २६ ते ३० जून दरम्यान पाऊस वाढणार; १ ते ७ जुलै दरम्यान मुंबई-पुण्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा!

हवामान अंदाज: २६ ते ३० जून दरम्यान पाऊस वाढणार; १ ते ७ जुलै दरम्यान मुंबई-पुण्यात भयंकर अतिवृष्टीचा इशारा!
Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Author: Sandip N Nakade

Published:

हवामान अंदाज: २६ जून ते ३० जून दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; १ ते ७ जुलै मुंबई-पुण्यात १,२०० मिमी पावसासह भयंकर अतिवृष्टीचा इशारा!

 

 "शेतकरी बांधवांनो, २५ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला असून अनेक नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. जे भाग अजूनही पावसापासून वंचित आहेत, तिथेही आता घाबरण्याचे कारण नाही. आज २६ जूनपासून ते ३० जूनपर्यंत राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून भाग बदलत सर्वत्र पेरणीयोग्य पाऊस पडेल. मात्र, १ जुलै ते ७ जुलै दरम्यान मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात १००० ते १२0० मिलिमीटर इतकी 'भयंकर अतिवृष्टी' होण्याचा अंदाज आहे," असा अत्यंत कडक इशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.

 

२५ जूनपर्यंत अनेक भागात पूर; आता वंचित भागातही पाऊस!

 

गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे मुक्ताईनगर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ परिसर, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागांतील ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. डख यांनी सांगितले की, आज २६ जूनपासून ३० जूनपर्यंत हा पाऊस आणखी तीव्र होईल. दुपारनंतर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडेल आणि उर्वरित पेरण्या पूर्ण होतील.

 

🚨 मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट': जनावरांची काळजी घ्या!

जुलै महिन्याचा पहिला आठवडा (१ ते ७ जुलै) राज्यासाठी अत्यंत धोक्याचा असेल.

 

  • मुंबई व पुणे परिसर: या ७ दिवसांत मुंबई आणि परिसरात तब्बल १,००० ते १,२०० मिमी इतका अभूतपूर्व पाऊस कोसळू शकतो. काही ठिकाणी एकाच दिवसात ढगफुटीसदृश पाऊस होईल.

  •  

  • धरण क्षेत्रात मोठी आवक: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर तसेच संगमनेर पट्टा आणि निळवंडे धरण परिसर, कोयना धरण भागात मुसळधार अतिवृष्टी होईल. यामुळे लहान-मोठे पाझर तलाव, साठवण तलाव आणि प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू होईल.

  •  

📢 शेतकऱ्यांना आवाहन: ओढे आणि नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. पूर येण्याची शक्यता असल्याने या ७-८ दिवसांत विशेष काळजी घ्यावी.

 

पेरणीबाबत डख यांचा थेट शेतातून सल्ला

"आमच्या स्वतःच्या शेतात इतका पाऊस झाला आहे की जमिनीत ईतभर ओल असूनही ट्रॅक्टर चालत नाही, त्यामुळे आम्ही पेरणी थांबवली आहे. शेतकरी बांधवांनो, जमिनीत ईतभर (पुरेशी) ओल असल्याशिवाय बियाणे टोचू नका, अन्यथा चार-सहा बोटांच्या ओलीवर पेरणी केल्यास ती खराब होऊ शकते," असा सल्ला त्यांनी दिला.

 

यंदा जूनमध्ये पाऊस कमी राहिला असला तरी जुलैमध्ये अतिवृष्टी, ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याने पिके यंदा जोमदार येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असेच ताज्या शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

शेअर करा