हवामान अंदाज: ३0 जून ते ८ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; मुंबई-पुण्याला अतिवृष्टीचा इशारा!

हवामान अंदाज: ३० जून ते ८ जुलै दरम्यान राज्यात कमी वेळेत जास्त पाऊस; मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा, जनावरांची काळजी घ्या!
"शेतकरी बांधवांनो, ज्या भागात अद्याप पाऊस झालेला नाही, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज ३० जूनपासून ते ८ जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असून राहिलेल्या सर्व भागांतील पेरण्या १० ते १५ जुलै दरम्यान पूर्ण होतील. या पावसाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळेत जास्त पाऊस पडणार असल्याने ओढ्याकाठची शेती धुऊन जाण्याची आणि शेतांचे बांध फुटण्याची शक्यता आहे," असा तातडीचा इशारा हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी थेट आपल्या शेतातून दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात आज दुपारपासून पावसाची सुरुवात!
मराठवाडा: परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ३० जून रोजी दुपारनंतर किंवा सायंकाळपासून जोराचा पाऊस सुरू होईल. आगामी ८ दिवसांत हा पाऊस दररोज भाग बदलत वेगवेगळ्या तालुक्यांत आणि गावांत पडणार असल्याने वंचित भागातील चिंता मिटणार आहे.
विदर्भ: विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशीम, हिंगोली, अमरावती आणि बुलढाणा या ११ जिल्ह्यांत ८ जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडेल आणि सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील.
🚨 मुंबई, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट': नद्यांना येणार पूर!
जुलै महिन्याचा पहिला आठवडा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून काही भागांत भयानक अतिवृष्टीचा अंदाज आहे.
अतिवृष्टीचे क्षेत्र: मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, ओझर, शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री आणि विघ्नहर कारखाना परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल.
धरण क्षेत्रात पाझर तलाव भरणार: उत्तर महाराष्ट्रात पाऊस काहीसा लेट असला तरी या ८ दिवसांत निळवंडे धरण, गंगापूर धरण आणि इतर कॅचमेंट एरियामध्ये इतका प्रचंड पाऊस पडेल की नदी-नाल्यांना पूर येऊन प्रमुख धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक सुरू होईल आणि लहान-मोठे बंधारे, पाझर तलाव पूर्ण भरतील.
पश्चिम महाराष्ट्र आणि वीज पडण्याबाबत विशेष इशारा
पश्चिम महाराष्ट्र: बारामती, सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही आजपासून पावसाला सुरुवात होत असून ८ दिवसांत येथील सुटलेले सर्व भाग कव्हर होतील. या भागात राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण थोडे कमी राहू शकते, परंतु जमिनीत ईतभर ओल झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
⚡ जनावरांची काळजी घ्या: या पावसादरम्यान मोठ्या प्रमाणात वीज कडाडण्याची आणि वादळी वारा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस चालू असताना शेतकरी बांधवांनी आपली दुभती जनावरे व पाळीव प्राण्यांना झाडाखाली अजिबात बांधू नये, असा कडक सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे.
यंदा जून महिन्यात पाऊस कमी राहिला असला तरी जुलैमध्ये धुमाकूळ, ऑगस्टमध्ये दोन मोठे पाऊस आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस दमदार होणार असल्याने दुष्काळाची चिंता पूर्णपणे मिटली आहे.