पावसामुळे फूल उत्पादन घट, फुलांच्या दरात वाढ…

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

पावसामुळे फूल उत्पादन घट, फुलांच्या दरात वाढ…

पावसामुळे फूल उत्पादन घट, फुलांच्या दरात वाढ…

जिल्ह्यामध्ये झेंडू, लिलीचे उत्पादन घेणारे शेतकरी असले तरी अन्य फुले मात्र कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथूनच येतात. पावसामुळे फुलांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

गणेशोत्सवामुळे मात्र फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे दिसून येत आहे. फुलांची आवक कमी झाल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेने आवक कमीच राहिलेली आहे.

त्यामुळे फुलांचा भाव वाढला आहे. पूजा साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. गणेशोत्सवात झेंडूसाठी मागणी असल्याने काही शेतकरी झेंडूची लागवड करतात. 

पण, पावसामुळे झेंडूचे पीक खराब झाल्याने त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणे अवघड झाले आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या फुलांवरच जिल्ह्यातील ग्राहकांची भिस्त आहे.

फुलांचे प्रति किलोचे दर:

फूलाचे नावकिंमत
झेंडू१०० ते १२० रुपये
निशिगंध८०० ते ९०० रुपये
शेवंती२५० रुपये
रुबी गुलाब५०० रुपये
डच गुलाब२५० रुपये (२० नग)
देशी गुलाब७०० रुपये (शेकडा)

प्लास्टिक फुलांना मागणी:

ताज्या फुलांच्या दरात वाढ झाल्याने प्लास्टिकच्या फुलांनाही वाढती मागणी आहे. पावसामुळे ताज्या फुलांच्या बाजारपेठेला यंदा ८० टक्क्यांपर्यंत फटका बसला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मखर, आरास करण्यासाठी प्लास्टिकच्या फुलांचाच अधिक वापर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांची आवक ५० टक्केच आहे. अतिवृष्टीमुळे फूल पिकाचे नुकसान झाले आहे. झाडे कुजली, फुलांवर रोग पडला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने आवक कमी आहे. तसेच फुलांचे दर तेजीत आहेत.