दुधाला 30 रुपये भाव जाहीर आणि सरकारही देणार अनुदान, जाणून घ्या दुधाचा सध्याचा भाव

Avatar of Krushi Kranti Editorial Desk
Krushi Kranti Editorial Desk

Published:

दुधाला 30 रुपये भाव जाहीर आणि सरकारही देणार अनुदान, जाणून घ्या दुधाचा सध्याचा भाव

दुधाला 30 रुपये भाव जाहीर आणि सरकारही देणार अनुदान, जाणून घ्या दुधाचा सध्याचा भाव 

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्याने राज्यामधील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये आले होते. 

दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याकरिता दुधाला प्रतिलिटर 30 रुपये स्थायीभाव व शासनाकडून 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुधाचे नवे दर दि. 1 जुलै पासून लागू होतील. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले.

देशातील आणि राज्यातील दूध उत्पादनाचा खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांची  आर्थिक स्थिती डगमगली आहे. शिवाय दुधाला अपेक्षित असा दर नसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रास्ता रोको, चक्का जाम आंदोलन देखील राबविण्यात आले. 

त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चर्चेला आला. यावेळी दूध दर वाढविण्याबाबत विचारमंथनानंतर सर्वानुमते १ जुलैपासून दुधाला प्रतिलिटर ३५ रुपये दर देण्याचे ठरले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता शेतकर्‍यांना दिलासा मिळणार का?

विखे पाटील म्हणाले, राज्य भरातील सहकारी तथा खासगी दूध उत्पादक संघ, व  दूध उत्पादक शेतकऱ्यांची तातडीची बैठक घेऊन दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. 

राज्यातील सर्व खासगी तथा सहकारी दूध संघाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 30 रु. भाव देण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच शासन शेतकर्‍यास 5 रुपये प्रतिलिटरच असे अनुदान दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करेल. 

त्यामुळे शेतकर्‍यांना  प्रतिलिटर 35 रुपये मिळून शेतकर्‍यांना दिलासा मिळेल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

भुकटी प्रकल्पासाठी अनुदान:

मंत्री विखे पाटील म्हणाले, मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडर व बटरची मागणी कमी झाल्याने त्यांचे दर हे घसरत आहेत. त्यामुळे राज्यात दूध पावडरचा मोठा साठा हा शिल्लक आहे. 

म्हणून राज्यामधील जे दूध प्रकल्प भुकटी निर्यात करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रतिकिलोसाठी 30 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही अनुदानाची मर्यादा 15 हजार मॅट्रिक टनाकरिता असणार आहे.